मंगळवार, २४ डिसेंबर, २०१३

सोनेरी खिडक्‍यांचे घर

ए का गावातील छोट्याशा टेकडीवर एक कुटुंब राहत होते. त्यांचे घर अत्यंत लहान होते. त्या घरात राहणारी एक मुलगी रोज अंगणात खेळायची. लहान असताना कुंपणाबाहेर तिची नजर पोहचू शकत नसे; मात्र जसजशी ती मोठी होत होती, तशी ती एका गोष्टीकडे आकर्षित होऊ लागली. दूर टेकडीवर असणाऱ्या एका बंगल्याकडे तासनतास पाहण्याचा चाळाच तिला लागला. त्या बंगल्याच्या खिडक्‍यांप्रमाणे सोनेरी खिडक्‍या आपल्याही घराला पाहिजे होत्या, असे तिला वाटे.

रोज सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत ती त्या बंगल्याचे निरीक्षण करीत राही. वास्तविक तिचे स्वतःच्या घरावर आणि कुटुंबीयांवरही भरपूर प्रेम होते; मात्र राहून राहून तिच्या मनात त्याच बंगल्याचा विचार घोळत असे. एक दिवशी तिने धाडस करून आईला विचारले, की आपल्याला गाडी घेऊन बाहेर जायचे आहे. आईने तिला नकार दिला. आईची खूप मनधरणी केल्यावर शेवटी आईने तिला परवानगी दिली; मात्र खूप लांब जाऊ नकोस, असे समजावले.
गाडी घेऊन निघाल्यावर तिला वाऱ्यावर स्वार झाल्यासारखे वाटले. फिरत फिरत ती त्या टेकडीपाशी येऊन पोचली. मग मात्र तिला त्या बंगल्याजवळ जाण्याचा मोह आवरला नाही. ती बंगल्याच्या दिशेने जाऊ लागली. जवळ जाताच बंगल्याच्या सोनेरी खिडक्‍यांकडे तिची नजर वळली. दुरून सुंदर दिसणाऱ्या त्या खिडक्‍या आत्ता मात्र अतिशय खराब व धुळीने भरलेल्या होत्या. ते पाहून तिच्या मनात आजपर्यंत आलेले सगळे विचार निघून गेले. ती मागे फिरली; तेव्हा तिला दूरवर एक छोटेसे घर दिसले. त्या घरावर सूर्यप्रकाश पडल्याने त्या घराच्या खिडक्‍याही सोनेरी रंगात चमकत होत्या. ते दृश्‍य पाहताच तिचे डोळे उघडले. इतकी वर्ष त्या सोनेरी खिडक्‍या आपल्या जवळ असूनही आपण उगाचच दुसरीकडे शोधत बसलो, याचे तिला वाईट वाटले.

तात्पर्य: आपल्या जवळ असलेल्या गोष्टींकडे आपण दुर्लक्ष करतो आणि दुसऱ्याच गोष्टींचा हव्यास धरतो. त्यापेक्षा आपल्याकडे काय आहे, ते ओळखून त्याची कदर करा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा